बिहार : डॉक्टरांनी वेळेत उपचार न केल्यामुळे एका ८ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या मुलीच्या घशात लिचीचे बी अडकले होते, त्यामुळे मुलीचे वडील तात्काळ तिला घेऊन रुग्णालयात आले. परंतु, डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्यामुळे या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. बिहारमधील मुझफ्फरपूर येथील एका रुग्णालयात ही घटना घडली आहे. मृत मुलीचे वडिल म्हणाले की, डॉक्टरांनी बराच वेळ मुलीवर उपचार केला नाही, त्यामुळे मुलीने आपला जीव गमावला.
कुढणी भागातील रघुनाथपूर मधुबन गावात राहणाऱ्या मुलीच्या घशामध्ये लिचीची बी अडकली, त्यामुळे मुलीचे वडील संजय राम यांनी तिला तात्काळ कुढणी पीएससी येथे नेले, तेथे सदर रुग्णालय रेफर करण्यात आले. त्यामुळे तिचे वडील तिला घेऊन सदर रुग्णालयात पोहोचले. परंतु, येथे डॉक्टरांनी काहीही ऐकून न घेता मुलीची कोरोना चाचणी करण्यास सांगितले. मुलीच्या असाहाय्य वडिलांनी तिची कोरोना टेस्टदेखील करुन घेतली. परंतु, त्यानंतर देखील मुलीचा कोरोना रिपोर्ट येईपर्यंत डॉक्टर तिच्यावर उपचार करण्यासाठी तयार नव्हते.
दरम्यान, दुर्लक्ष व उपचाराअभावी त्यांची मुलगी राधा कुमारी हीच मृत्यू झाला. आपत्कालीन परिस्थितीत ऑन ड्युटी डॉक्टर येईपर्यंत या निरागस मुलीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सिव्हिल सर्जन डॉ. एस.के. चौधरी यांनी अशा प्रकारे डॉक्टरांनी केलेले दुर्लक्ष गंभीर असल्याचे सांगत चौकशी व कारवाईची गरज असल्याचे म्हटले आहे.
हृदयद्रावक : चिमुकलीचा कारमध्ये गुदमरून मृत्यू, वडिलांनी दुसऱ्या दिवशी गाडीचा दरवाजा उघडला आणि…




