जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात गुरुवारी भारतीय लष्कराला मोठा धक्का बसला. डोडा येथील भादरवाह–चंबा आंतरराज्यीय मार्गावर खानी टॉपजवळ लष्कराचे बुलेटप्रूफ वाहन रस्त्यावरून घसरून सुमारे 200 फूट खोल दरीत कोसळले. या भीषण अपघातात 10 जवानांचा जागीच मृत्यू झाला असून, इतर अनेक जवान गंभीर जखमी झाले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, हे लष्करी वाहन उंच भागातील चौकीकडे जात होते. वाहनात सुमारे 20 जवान प्रवास करत होते. डोंगराळ आणि वळणावळणाच्या रस्त्यावरून जात असताना अज्ञात कारणामुळे वाहनाचा ताबा सुटला आणि भीषण दुर्घटना घडली.
अपघाताची माहिती मिळताच लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी संयुक्तपणे तातडीने बचावकार्य सुरू केले. कठीण भूभाग असूनही रात्रभर प्रयत्न करत 10 जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. जखमी जवानांना सुरक्षित बाहेर काढून तात्काळ वैद्यकीय मदत देण्यात आली.
गंभीर जखमी असलेल्या तीन जवानांना हेलिकॉप्टरद्वारे उधमपुर येथील कमांड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. उर्वरित जखमी जवानांवर स्थानिक लष्करी वैद्यकीय केंद्रात उपचार सुरू आहेत.
लष्कराने या घटनेबाबत अधिकृत निवेदन जारी करत अपघाताची सखोल चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. शहीद जवानांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली असून, लष्कराकडून आवश्यक सर्व मदत दिली जाणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
Deeply saddened at the loss of lives of 10 of our brave Indian Army soldiers in an unfortunate road accident in Doda. We will always remember the outstanding service and supreme sacrifice of our brave soldiers. My deepest condolences to the grieving families.
— Office of LG J&K (@OfficeOfLGJandK) January 22, 2026
दरम्यान, डोडा जिल्हा हा सध्या संवेदनशील मानला जात आहे. परिसरात दहशतवादी हालचाली वाढल्या असून लष्कराकडून सतत शोधमोहीम सुरू आहे. अहवालांनुसार डोडा आणि आसपासच्या भागात 30 ते 35 पाकिस्तानी दहशतवादी सक्रिय असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर जवानांची तैनाती वाढवण्यात आली असून सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत.




