मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीतील अभिनेता कमल रॉय यांचे वयाच्या 54व्या वर्षी चेन्नई येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने चित्रपट आणि दूरदर्शन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कमल रॉय हे प्रसिद्ध नाट्य अभिनेते छावरा व्ही.पी. नायर आणि विजयालक्ष्मी यांचे पुत्र होते. कलावंतांचा वारसा लाभलेल्या या कुटुंबात त्यांचे आजोबा सुरनंद कुंजन पिल्लई हे सुप्रसिद्ध कोशकार, इतिहासकार, कवी आणि साहित्य समीक्षक म्हणून ओळखले जात होते.
चित्रपटसृष्टीत काही काळ सक्रिय नसतानाही कमल रॉय यांचा चाहतावर्ग मोठा होता. विशेषतः खलनायकाच्या भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या अभिनयातील तीव्रता आणि पडद्यावरील प्रभावी उपस्थिती यासाठी ते ओळखले जात होते.
कमल रॉय यांनी ‘सयुज्यम’ (१९७९), ‘कोलिलक्कम’ (१९८१), ‘मंजू’ (१९८३), ‘किंगिनी’ (१९९२), ‘कल्याण सौगंधिकम’ (१९९६), ‘वाचलम’ (१९९७), ‘शोभनम’ (१९९७) आणि ‘द किंगमेकर लीडर’ (२००३) अशा अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. मोहनलाल अभिनीत ‘युवजनोत्सवम’ (१९८६) या चित्रपटातील ‘एनुमेंटे कन्नुनिराल’ या गाजलेल्या गीतातही ते झळकले होते. याशिवाय ‘शारदा’सारख्या दूरदर्शन मालिकांमधूनही त्यांनी अभिनयाची छाप पाडली.
दिग्दर्शक विनयन दिग्दर्शित ‘कल्याण सौगंधिकम’ या चित्रपटातील कमल रॉय यांच्या खलनायकाच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते. त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना विनयन यांनी सोशल मीडियावर लिहिले की, ज्येष्ठ अभिनेत्री सुकुमारी यांनी कमल रॉय यांच्याबद्दल सांगितल्यानंतरच त्यांना या चित्रपटात संधी देण्यात आली होती.
अभिनेत्री उर्वशी, कल्पना आणि कलारंजिनी यांचे बंधू असलेल्या कमल रॉय यांचे करिअर त्यांच्या बहिणींइतके दीर्घ किंवा गाजलेले नसले, तरी त्यांनी आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने मल्याळम चित्रपटसृष्टीतील एक परिचित चेहरा काळाच्या पडद्याआड गेला आहे.




