पुणे : सणासुदीचा काळ सुरु झालेला आहे आणि लवकरच दिवाळीदेखील येणार आहे, त्यामुळे लोकांचा उत्साह दुप्पट झाला आहे. मिठाईशिवाय तर भारतीय सण अपूर्ण आहेत. मात्र यानिमित्ताने काही लोक चुकीच्या मार्गाने अवाजवी पैसे कमावण्यासाठी आणि नफेखोरीपोटी खव्यापासून बनवलेल्या मिठाई तसेच अन्य मिठाईमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ करतात. अशा परिस्थितीत सणासुदीच्या काळात आपल्या आवडीचे खाद्यपदार्थ खरेदी करण्यापूर्वी आणि खाण्यापूर्वी काळजी घेण्याची खूप गरज आहे. खवा भेसळयुक्त आहे की नाही हे आपण कसे शोधावे ते आपण जाणून घेऊया.
खवा खरेदी करताना काळजी घ्या
खवा हा मिठाई बनवण्याचा मुख्य घटक आहे. परंतु त्याच्या शुध्दतेबद्दल नेहमीच प्रश्न उपस्थित होतात. काही लोक मिठाई बनवण्यासाठी सिंथेटिक खवा वापरतात. जर तुम्ही मिठाई बनवण्यासाठी बाजारातून खवा विकत घेत असाल, तरी तुम्ही खूप सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण भेसळयुक्त खव्यापासून बनवलेली मिठाई तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते.
खवा आपल्या हातांनी चोळून बघा
खवा किंवा त्यापासून बनवलेली मिठाई खरेदी करण्यापूर्वी तुम्ही त्याची शुद्धता सहज तपासू शकता. शुद्ध आणि ताज्या खव्याचा पोत तेलकट आणि दाणेदार असतो. थोडासा खवा घ्या आणि तळहातावर रगडा, त्यात दाणेदार पोत असेल आणि तेलाचे काही अंश निघत असतील आणि थोडी गोड चव असेल तर तो खवा शुद्ध आहे असे समजावे. शुद्ध खवा रगडल्यानंतर त्याची चव थोडीशी गोड होते आणि खवा तेल सोडू लागतो. शुद्ध खवा ओळखण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे.
खव्यात साखर टाकून मिश्रण उकळवा
भेसळ तपासण्याची दुसरी सोपी पद्धत म्हणजे खव्यात थोडी साखर टाकून हे मिश्रण उकळवा. जर मिश्रण पाणी सोडू लागले तर ते भेसळयुक्त आहे.
गरम पाणी आणि आयोडीनने चाचणी करा
अन्न मानक आणि सुरक्षा प्राधिकरण (FSSAI) नुसार, खव्याची गुणवत्ता तपासण्यासाठी, एक चमचा खवा घ्या आणि तो एक कप गरम पाण्यात मिसळा. आता कपमध्ये आयोडीनचे काही थेंब टाका. आयोडीन टाकल्यानंतर खवा निळा झाला तर त्यात स्टार्चची भेसळ केलेली आहे. जर तसे झाले नाही तर तो खवा शुद्ध आणि वापरण्यास योग्य आहे.
हायड्रोक्लोरिक ऍसिडने ओळखा मिठाई शुद्ध आहे की नाही?
बऱ्याच मिठाई तुपाऐवजी वनस्पति तुपामध्ये बनवल्या जातात. वनस्पति तुपाचे जास्त प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते, कारण त्यात ट्रान्स फॅट जास्त असते आणि यामुळे स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो. खव्याच्या मिठाईमध्ये वनस्पति तुपाची उपस्थिती तपासण्यासाठी, ती एका कंटेनरमध्ये घ्या. आता त्यात 2 टेबलस्पून हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि 1 टेबलस्पून साखर घाला, जर मिश्रण लाल झाले तर मिठाई अशुद्ध आहे.




