कोलकाता: प्रसिद्ध बॉलिवूड पार्श्वगायक केके ऊर्फ कृष्णकुमार कुन्नत यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. केके हे कोलकात्यातील एका कॉन्सर्टमध्ये सहभागी झाले होते. मात्र, या कॉन्सर्टनंतर त्यांची तब्येत बिघडली आणि ते अचानक खाली कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत्यूसमयी ते ५३ वर्षांचे होते.
पार्श्वगायक केके यांच्या निधनाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचे निधन हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाले आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूबाबत डॉक्टरांनी काहीही माहिती सांगितलेली नाही. केके यांच्या शवविच्छेदनानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण अधिकृतपणे स्पष्ट होणार आहे. केके यांची बॉलिवूडमधील सर्वोत्तम गायकांमध्ये गणना होत असे. त्यांनी अनेक भारतीय भाषांमधील गीतांना आपला आवाज दिला आहे. आतापर्यंत त्यांनी २०० हून अधिक सुपरहिट गाणी गायली आहेत. ९० च्या दशकात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या यारो या गाण्याने त्यांना अमाप प्रसिद्धी मिळवून दिली. हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील ‘तडप तडप के इस दिल से आह निकलती रहे’ हे केकेंचे गाणे गाजले. केके यांनी रोमॅण्टिक गाण्यांसह पार्टी साँगपर्यंतची सर्व गाणी गायली आहेत.
बॉलिवूडमधील अभिनेते आणि अभिनेत्री, तसेच गायकांनी गायक केके यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अभिनेता अक्षय कुमार, गायक अरमान मलिक, अभिनेत्री सोनल चौहान आणि अभिनेत्री मुनमुन दत्ता यांनी केके यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ‘केकेसर या जगात नाहीत, यावर आमचा विश्वासच बसत नाही’, अशा शब्दात गायक अरमान मलिक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले कि, प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुननाथ यांच्या अकाली निधनाने दु:ख झाले, के.के. त्याच्या गाण्यांमध्ये सर्व वयोगटातील लोकांमध्ये विविध प्रकारच्या भावनांचे प्रतिबिंब दिसून आले. त्यांच्या गाण्यातून आम्ही त्यांची आठवण कायम ठेवू. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांच्या संवेदना. ओम शांती.
Saddened by the untimely demise of noted singer Krishnakumar Kunnath popularly known as KK. His songs reflected a wide range of emotions as struck a chord with people of all age groups. We will always remember him through his songs. Condolences to his family and fans. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) May 31, 2022




