रांची : विमान वाहतूक नियामक DGCA ने इंडिगोला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. 7 मे रोजी रांची विमानतळावर एका अपंग मुलाला विमानात चढण्यापासून रोखल्याप्रकरणी नियामकाने ही कारवाई केली आहे. इंडिगोने 9 मे रोजी सांगितले होते की, प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, एका वेगळ्या दिव्यांग मुलाला 7 मे रोजी रांची-हैदराबाद फ्लाइटमध्ये चढू दिले नाही कारण तो घाबरलेला दिसत होता.
मुलाला विमानात चढण्यास मज्जाव करण्यात आल्याने त्याच्यासोबत असलेल्या पालकांनीही विमानात न चढण्याचा निर्णय घेतला. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या घटनेच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय पथक स्थापन केले होते. एका निवेदनात, डीजीसीएने म्हटले आहे की, “7 मे रोजी रांची विमानतळावर इंडिगो कर्मचार्यांनी अपंग मुलासोबत केलेले वर्तन अयोग्य होते आणि त्यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळली होती.”
एअरलाइनने काय चूक केली?
निवेदनात असे म्हटले आहे की मुलाशी सहानुभूतीने वागायला पाहिजे होते आणि मुलाची भीती दूर करून त्याला शांत करायला पाहिजे होते. निवेदनानुसार, विशेष परिस्थितींमध्ये असाधारण प्रतिसाद आवश्यक आहे, परंतु एअरलाइन कर्मचारी तसे करण्यात अयशस्वी झाले आहेत. हे पाहता, DGCA मधील सक्षम प्राधिकरणाने संबंधित विमान नियमांच्या तरतुदींनुसार विमान कंपनीला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रकरण कसे चिघळले?
इंडिगोला आपली बाजू मांडण्यासाठी २६ मे पर्यंत वेळ देण्यात आला होता आणि शनिवारी डीजीसीएने या संदर्भात अंतिम निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, दिव्यांगांना विमानात बसू न देण्याच्या प्रकरणी डीजीसीए आणि इंडिगोच्या तीन सदस्यांच्या टीमने चौकशी करून पुरावे गोळा केले होते. तपास पथकाने घटनेच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेजही स्कॅन केले होते. यादरम्यान, डीजीसीए टीमला असे आढळून आले की इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी बोकारोहून आलेल्या जोडप्याशी आणि त्यांच्या मुलाशी गैरवर्तन केले आणि त्यांना विमानात बसू दिले नाही. या प्रकरणी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या वतीनेही नाराजी व्यक्त करण्यात आली असून, अशा वर्तनाला शून्य सहनशीलता (zero tolerance) असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.




