दिल्ली : दिल्लीत शनिवारी मंकीपॉक्सचा पाचवा रुग्ण आढळून आला आहे. लोकनायक रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या आफ्रिकन वंशाच्या महिला रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही एक 22 वर्षीय आफ्रिकन महिला असून तिचा नायजेरियाच्या प्रवासाचा इतिहास आहे. ही महिला दक्षिण दिल्लीत राहत होती. मंकीपॉक्सची लक्षणे दिसल्यानंतर तिला लोकनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी आलेल्या अहवालात मंकीपॉक्सची पुष्टी झाली आहे.
सध्या 4 रुग्ण रुग्णालयात दाखल असून 1 रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. लोकनायक रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. सुरेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंकीपॉक्सची लागण झालेली महिला मूळची आफ्रिकेतील आहे. लक्षणे आढळल्यानंतर महिलेचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, जे पॉझिटिव्ह आले आहेत. महिलेची प्रकृती उत्तम असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. सुरेश यांनी सांगितले की लोकनायक रुग्णालयात मंकीपॉक्सचे एकूण पाच रुग्ण आढळून आले आहेत, यापैकी एक रुग्ण बरा झाल्यानंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर मंकीपॉक्सचे चार रुग्ण रुग्णालयात दाखल असून, त्यात दोन महिला आणि दोन पुरुष रुग्णांचा समावेश आहे. चारही रुग्णांची प्रकृती उत्तम आहे. यापूर्वी सापडलेले तीन रुग्णही वेगाने बरे होत आहेत.




