झारखंड : झारखंडमधील पलामू जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणाचे प्रकरण समोर आले आहे. शनिवारी नौदिहा गावातील एका व्यक्तीला कुत्रा चावला होता, त्यानंतर ती व्यक्ती पाटण ब्लॉक मुख्यालय आरोग्य केंद्रात रेबीज प्रतिबंधक लस घेण्यासाठी आली होती. मात्र आरोग्य कर्मचाऱ्याने त्याला चुकून कोरोनाची लस दिली.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 50 वर्षीय राजू नावाच्या ये व्यक्तीने अगोदरच कोरोनाच्या दोन्ही लसी घेतलेल्या आहेत. कुत्रा चावल्यामुळे ते अँटी रेबीजचे इंजेक्शन घेण्यासाठी आले होते. परंतु, यावेळी आरोग्य कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे त्यांना पुन्हा कोरोनाची लस देण्यात आली आहे.
पलामू विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी (सिव्हिल सर्जन) डॉ. अनिल कुमार यांनी ही बाब निष्काळजीपणाची असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘याचा तपास करण्यासाठी डॉ.एम.पी.सिंह यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक तपासासाठी पाटणला जाणार आहे. या टीममध्ये डॉ. अनुप कुमार तसेच जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (DPM) दीपक कुमार यांचा समावेश आहे. तपासणी अहवाल आल्यानंतरच संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे डॉ. अनिल कुमार यांनी सांगितले. सध्या रुग्णाची प्रकृती सामान्य असल्याचे त्यांनी सांगितले.




