नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरबाबत लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी, विक्रम मिस्री (परराष्ट्र सचिव), कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी सैन्याच्या कारवाईवर आपले विचार व्यक्त केले. पत्रकार परिषदेदरम्यान, लष्कराने दहशतवादाविरुद्धचा एक व्हिडीओ देखील दाखवला ज्यामध्ये मध्य प्रदेश हल्ला, २६/११ हल्ला आणि पहलगाम हल्ला दाखवण्यात आला होता.
कर्नल सोफिया कुरेशी यांनी मिशन सिंदूरबद्दल सांगितले की, ऑपरेशन सिंदूर पहाटे १:०५ वाजता सुरू झाले आणि १:३० वाजता संपले. हे संपूर्ण ऑपरेशन २५ मिनिटे चालले. या कारवाईत दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. आम्ही गुप्तचर माहितीच्या आधारे टार्गेट निवडले. निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही याची काळजी घेण्यात आली.
कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या, सर्वप्रथम सवाई नाला कॅम्प मुझफ्फराबादला लक्ष्य करण्यात आले. येथे लष्कर तैयबाची एक छावणी होती. त्यानंतर सय्यदा बिलाल कॅम्प मुजफ्फराबादला लक्ष्य करण्यात आले. हे दहशतवाद्यांसाठी प्रशिक्षण क्षेत्र होते. त्यानंतर पाकिस्तानच्या आत, सरजल कॅम्प सियालकोटला लक्ष्य करण्यात आले. त्यानंतर महमूना जाया कॅम्प सियालकोटला लक्ष्य करण्यात आले. महमूना जाया कॅम्प हा एक खूप मोठा दहशतवादी कॅम्प होता. इथे नेहमीच दहशतवादी असायचे आणि मोठे दहशतवादीही इथे यायचे. येथूनच योजना आखण्यात आली होती आणि काश्मीरला लक्ष्य करण्यात आले.
कर्नल सोफिया कुरेशी पुढे म्हणाल्या, मरकज तैयबा मुरीदकेला लक्ष्य करण्यात आले. २६/११ चा हल्ला येथेच रचण्यात आला होता आणि अजमल कसाबलाही येथेच प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यानंतर भागलपूरमधील मरकझ सुभान अल्लाह येथील जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय लक्ष्य करून ते उद्ध्वस्त करण्यात आले. जैशचे वरिष्ठ दहशतवादी नेहमीच येथे येत असत. भारतीय सैन्याने स्पष्टपणे सांगितले की आमच्या कारवाईत कोणत्याही लष्करी तळाला लक्ष्य केले गेले नाही. यासोबतच, जर पाकिस्तानने काहीही करण्याचा प्रयत्न केला तर आमचे सैन्य त्यासाठी तयार आहे, असे लष्कराने ठणकावून सांगितले.
#WATCH | #OperationSindoor, Col. Sofiya Qureshi says, “Operation Sindoor was launched to give justice to victims of Pahalgam terrorist attack. Nine terrorist camps were targeted and destroyed.” pic.twitter.com/8nbLHN6a3k
— ANI (@ANI) May 7, 2025
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, लष्कर तैयबाच्या दहशतवाद्यांनी पहलगाम हल्ला केला ज्यामध्ये २६ लोक मारले गेले. मुंबई हल्ल्यानंतर पहलगाम हल्ला हा नागरिकांवर झालेला सर्वात मोठा हल्ला होता. पहलगाम हल्ला क्रूर होता. या हल्ल्यात निर्दोष नागरिकांना त्यांच्या कुटुंबासमोर गोळ्या घालून ठार मारण्यात आले. काश्मीरमधील शांतता भंग करण्यासाठी हा हल्ला करण्यात आला.
ते पुढे म्हणाले की, पाकिस्तान दहशतवाद्यांना केवळ आश्रय देत नाही, तर त्यांना सक्रिय पाठिंबाही देतो. पाकिस्तानचे दहशतवाद्यांशी असलेले संबंध उघड झाले आहेत. पहलगाम हल्ल्यातील गुन्हेगारांना आणि योजना आखणाऱ्यांना शिक्षा करणे हे आमचे उद्दिष्ट होते. भारतावर आणखी हल्ले करण्याची योजना असल्याची गुप्तचर माहिती होती. अशा परिस्थितीत, भारताने आज सकाळी कारवाई केली आहे. आम्ही दहशतवाद्यांवर कारवाई केली आहे. ही कारवाई भारताच्या सुरक्षिततेसाठी आणि दहशतवादाला मूळापासून नष्ट करण्याच्या उद्देशाने केली आहे.




