मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या ९ तळांवर एअर स्ट्राईक करून तीव्र कारवाई केली. ही कारवाई ७ मे रोजी मध्यरात्री १ ते १.३० च्या सुमारास करण्यात आली. देशभरातून या कारवाईचे स्वागत होत असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या ऑपरेशनबाबत वेगळी भूमिका मांडली आहे.
पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ”जेव्हा पहलगामवर हल्ला झाला तेव्हा मी पहिल्यांदा ट्विट केलं होतं, त्यात म्हटलं होतं की, ज्यांनी हल्ला केला आहे त्यांना धडा शिकवायला पाहिजे, जो त्यांच्या पिढ्यांना लक्षात राहायला पाहिजे. पण दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं. युद्ध हे काही उत्तर नाही. अमिरेकेमध्ये दोन ट्विन टॉवर पाडले, त्यांनी काही युद्ध नाही केलं, अतिरेकी ठार मारले.”
ते पुढे म्हणाले की, ”ही अशी दुसऱ्या देशामध्ये युद्ध परिस्थिती आणायची. ते काय मॉकड्रिल करायचं आणि ते काय सायरन वाजवायचं, पण मुळात ही गोष्ट का घडली, हे पण आपण लक्षात घ्यायला हवं. थोडसं अर्तंमुख होऊन आपला विचार करायला पाहिजे. पाकिस्तान अगोदरच बरबाद झालेला देश आहे, त्याला काय बरबाद करायचं? पण प्रश्न असा आहे की, ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला ते तुम्हाला सापडले नाही. ज्या ठिकाणी इतके वर्ष पर्यटक जात आहे तिथे सुरक्षा का नव्हती. मला वाटत हे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत. आपल्या देशामध्ये कोम्बिंग ऑपरेशन करुन त्यांना शोधून काढणे हे जास्त महत्त्वाचे आहे. हे एअर स्ट्राइक करून लोकांना भलत्या ठिकाणी भरकटवून युद्ध हे काही उत्तर नाही. ”
”दुसरीकडे कसं झालं आहे ना, सरकारच्या चुका दाखवल्या पाहिजे. ज्यावेळी हा प्रकार झाला तेव्हा पंतप्रधान सौदी अरेबियला होते. तो दौरा अर्धवट सोडून ते बिहारला आले. ही गोष्ट करायची गरज नव्हती. तिकडे अदानीच्या कोर्टचं उद्धाटन केलं. मग इकडे फिल्म जगतसाठी वेवचा कार्यक्रम केला. इतकी जर गंभीर परिस्थिती आहे, या गोष्टी टाळत्या आल्या असत्या. आणि त्याच्या नंतर येऊन मॉकड्रिल करायचं आणि मग काय एअर स्ट्राइक करायचं हे काही उत्तर नाही आहे. त्यापेक्षा ज्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला त्यांना शोधून काढावं. त्यांचा बंदोबस्त करणं आणि संपूर्ण देशामध्ये मॉकड्रिल करण्यापेक्षा कोम्बिंग ऑपरेशन करा. जिकडे जिकडे तुम्हाला माहिती आहे तिथे. महाराष्ट्र आणि मुंबईमधील पोलिसांना सर्व गोष्टी माहिती आहे. त्यांचं मला कौतुक आहे. त्यांना कुठे आहे सुरु आणि काय घडतं आहे हे माहिती आहे.”
आज आपल्या देशातील प्रश्न संपत नाहीय आणि आपण युद्धाला सामोरे जात आहोत. मला वाटतं ही काही योग्य गोष्ट नाही. नाक्या-नाक्यावर ड्रग्ज मिळतात, हे येतात कुठून या गोष्टींपर्यंत पोहोचा. शाळा-महाविद्यातील मुलांपर्यंत ड्रग्ज कसे पोहोचू लागलेत. या गोष्टींच्या खोलात गेले पाहिजे. हे असे ‘ऑपरेशन सिंदूर’ नाव देऊन भावनांचा विषय येत नाही, प्रश्न असा आहे की, तु्म्ही काय पाऊल उचलताय.



