दिल्ली : आरजेडीचे खासदार अमरेंद्र धारि सिंह यांना ED ने खत घोटाळ्याशी संबंधित पैशांच्या अफरातफरी प्रकरणात अटक केली आहे. त्यांना धन-शोधन निवारण अधिनियम कायद्याच्या (Prevention of Money Laundering Act -PMLA) कलमांतर्गत अटक केली आहे. हे प्रकरण इफ्को (IFFCO) आणि इंडिया पोटॅश लिमिटेड (आयपीएल) शी संबंधित खतांच्या घोटाळ्याशी संबंधित आहे, ज्यामध्ये सीबीआयने गेल्या महिन्यात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. त्यांना दिल्लीच्या डिफेन्स कॉलनी भागातून अटक करण्यात आली आहे.
अमरेंद्र धारी सिंह हे पाटणा येथील बिक्रम ब्लॉक (विधानसभा मतदार संघ) येथील रहिवासी आहेत. अमरेंद्र हे एक मोठे व्यापारी आणि जमीनदार देखील आहेत. पाटण्यातील पाटलीपुत्र कॉलनीत त्यांचे खासगी निवासस्थान आहे आणि पालीगंजच्या अइनखा गावातही त्यांची बरीच मालमत्ता आहे. रिअल इस्टेटसह 13 देशांमध्ये खते व रसायनांची आयात करण्याचा व्यवसाय त्यांचा आहे. अमरेंद्र धारि सिंह हे ज्योती ट्रेडिंग कॉर्पोरेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत. ते 90 च्या दशकापासून खतांच्या निर्यातीत व आयातीमध्ये सहभागी आहेत. सिंग खासगी कंपन्यांसाठी खते आयात करतात आणि त्यांची मध्य-पूर्व देशांमध्ये आणि इतर देशांमध्ये निर्यात करतात.




