जोधपूर : आसाराम बापूंना कोरोनाची लागण झालीआहे. जोधपूर कारागृहात त्यांची चाचणी करण्यात आली होती, जी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर तापामुळे आणि ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा त्यांना महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते सध्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक छळ प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.
रुग्णालयात आणण्यापूर्वी तेथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात होता. आसाराम यांना रुग्णालयात आणताच अनेक समर्थक तेथे पोहोचले. पण पोलिसांनी कोणालाही आत जाऊ दिले नाही. हॉस्पिटलमध्ये आणताना आसाराम व्हीलचेयरवर दिसले. त्यांचे वजनही पूर्वीपेक्षा बर्यापैकी कमी असल्याचे दिसते.
जोधपूर कारागृहातील काही कैद्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून आसाराम यांचीही चाचणी घेण्यात आली. ज्यामध्ये त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. यानंतर तुरूंगातच आसाराम यांच्यावर उपचार करण्यात आले. पण रात्री तब्येत बिघडल्याने त्यांना दवाखान्यात न्यावे लागले.




