उत्तर प्रदेश : बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या महिलेला कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील कोर्टाने याप्रकरणी निकाल दिला आहे. या महिलेला २० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता करत दंडाच्या रकमेतील ५० टक्के रक्कम पीडित व्यक्तीला देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
लोनी बॉर्डर परिसरातील एका घरात महिला आपल्या कुटुंबासह भाड्याने राहत होती. तिथेच रजत देखील भाड्याने राहत होता. ६ ऑक्टोबर २०२० रोजी या महिलेने तिच्या मुलीवर रजतने बलात्कार केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली. महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी रजतला अटक केली होती. या प्रकरणी रजत तीन महिने तुरुंगात कैद होता. त्यानंतर त्याला जामीन मिळाला. या प्रकरणाची सुनावणी पॉक्सो अॅक्ट कोर्टात घेण्यात आली. शनिवारी या प्रकरणाची अंतिम सुनावणी झाली. न्यायाधीश महेंद्र श्रीवास्तव यांच्या कोर्टासमोर झालेल्या सुनावणीत साक्षीदार तपासण्यात आले. त्यात हा आरोप खोटा असल्याचे कोर्टात सिद्ध झाले. कोर्टाने रजतची निर्दोष मुक्तता केली.
बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या महिलेला २० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. दंडाच्या रकमेतून ५० टक्के रक्कम ही पीडित व्यक्तीला देण्याचे आदेश देण्यात आले. तसेच दंडाची रक्कम न भरल्यास महिलेला १५ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागेल, असा आदेश देण्यात आला.




