राजस्थान : राजस्थानच्या जयपूरमध्ये केबल इयरफोनचा स्फोट झाल्याने एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. हा तरुण कॉम्प्युटरला इयरफोन लावून गाणी ऐकत होता. अचानक मोठ्या आवाजासह इयरफोन फुटला आणि तरुणाच्या कानातून रक्त वाहू लागले. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरच्या सीकर महामार्गावरील उदयपूरिया गावात राहणाऱ्या 28 वर्षीय राकेश नागर या तरुणाचे फेब्रुवारीमध्येच लग्न झाले होते. तो अनेकदा अभ्यासासाठी कॉम्प्युटरचा वापर करत असे. शुक्रवारी दुपारी तो त्याच्या शेतातील घरामध्ये इयरफोनवर गाणी ऐकत होता. या दरम्यान इअरफोनचा स्फोट झाला आणि या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तरुणाच्या कुटुंबीयांनी सांगितले की, तो इयरफोन लावून अभ्यास करत होता.
घटना घडली त्यावेळी हा तरुण खोलीत एकटाच होता. त्याची आई, बहीण आणि कुटुंबातील सर्व सदस्य शेतात काम करत होते. मोठा आवाज ऐकून सगळे धावत आले. त्यानंतर रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नातेवाईकांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला. त्यामुळेच पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, इयरफोनच्या स्फोटामुळे झालेल्या मोठ्या आवाजामुळे या तरुणाला हृदयविकाराचा झटका आला असावा. हेच त्याच्या मृत्यूचे कारण बनले.




