1 killed, 3 injured as EV battery explodes in Andhra Pradesh
देश

नवीन इलेक्ट्रिक बाईकच्या बॅटरीचा भीषण स्फोट, 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, 3 जखमी

आंध्रप्रदेश : आंध्रप्रदेशातील विजयवाडा शहरातील एका 40 वर्षीय व्यक्तीच्या नवीन इलेक्ट्रिक बाईकच्या बॅटरीचा स्फोट होऊन त्याच्या बेडरूममध्ये आग लागून त्याचा मृत्यू झाला. बाईकची बॅटरी बेडरूममध्ये चार्जिंगसाठी ठेवली असता तिचा स्फोट झाला. शनिवारी पहाटे ही घटना घडली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, के. शिव कुमार या 40 वर्षीय व्यक्तीने त्याच्या बेडरूममध्ये नवीन इलेक्ट्रिक बाईकची बॅटरी चार्जिंगसाठी ठेवली होती, यावेळी स्फोट होऊन त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत त्याची पत्नी भाजली असून तिची प्रकृती गंभीर आहे. तर त्यांच्या दोन मुलांनाही श्वासोच्छवासाचा त्रास झाला होता, परंतु त्यांची प्रकृती स्थिर आहे.

के. शिव कुमार हे स्वयंरोजगार डीटीपी कामगार होते, त्यांनी शुक्रवारीच इलेक्ट्रिक बाईक खरेदी केली. वाहनाची वेगळी करता येणारी बॅटरी शुक्रवारी रात्री त्यांनी त्यांच्या बेडरूममध्ये चार्जिंगसाठी ठेवली होती, मात्र, पहाटे सर्वजण झोपेत असताना अचानक तिचा स्फोट झाला. स्फोटामुळे घरातील काही सामान जळून खाक झाले. घरातून धूर निघताना बघितल्यावर शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून आत अडकलेल्या कुटुंबाला बाहेर काढले. रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवत असताना शिवकुमार यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तिला 48 तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

“स्फोटाचे नेमके कारण समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी भेट दिली. बॅटरीचा स्फोट होण्याचे कारण इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट असू शकते का, हे तपासण्यासाठी ईव्ही कंपनीशी संपर्क साधण्यात आला आहे.” पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

विशेष म्हणजे, सरकारी थिंक टँक नीती आयोगाने दोन दिवसांपूर्वी इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी स्वॅपिंग धोरणाचा मसुदा तयार केला होता आणि स्वॅप करण्यायोग्य बॅटरीसाठी प्रोत्साहन तसेच कठोर चाचणी प्रोटोकॉल सुचवले होते. इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षेच्या मुद्द्यांवरील वाढत्या चिंतांदरम्यान हे करण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी सांगितले होते की, निष्काळजीपणा करणाऱ्या कंपन्यांना दंड आकारला जाईल आणि या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीचा अहवाल मिळाल्यानंतर सर्व दोषपूर्ण ईव्ही परत बोलावण्याचे आदेश दिले जातील.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत