नवी दिल्ली : राहुल गांधींच्या फ्लाइंग किसचा मुद्दा सभागृहात चांगलाच तापलेला आहे. भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्या राहुल गांधींवरील आरोपानंतर काँग्रेस नेते सातत्याने भाजपवर निशाणा साधत आहेत. याच पार्श्वभूमीवर बिहारमधील काँग्रेस आमदार नीतू सिंह यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. राहुल गांधी यांना मुलींची कमतरता नाही, असे वादग्रस्त विधान काँग्रेस आमदार नीतू सिंह यांनी केले आहे.
काँग्रेस आमदार नीतू सिंह यांनी ‘आमचे नेते राहुल गांधी यांना मुलींची कमतरता नाही’, असे वादग्रस्त विधान केले आहे. राहुल गांधींना फ्लाइंग किस द्यायचे असेल तर ते मुलीला देतील, ५० वर्षांच्या महिलेला फ्लाइंग किस का देतील? त्यामुळे स्मृती इराणी यांनी केलेले सर्व आरोप निराधार आहेत. फ्लाइंग किसचे कोणतेही प्रकरण नाही. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी स्वत: चं बघावं, ज्या मैत्रिणीने त्यांना संरक्षण दिले आणि मदत केली, तिच्याच पतीला पळवून यांनी लग्न केले.
स्मृती इराणी यांचे सुनियोजित षडयंत्र
स्मृती इराणी जर आमचे नेते राहुल गांधी यांच्याबद्दल बोलत असतील तर त्यांना लाज वाटली पाहिजे. आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तिथे असे काही घडलेले नाही. राहुल गांधी तर स्पीकरकडे बोट दाखवत होते, मग राहुल गांधी त्यांना फ्लाइंग किस देत आहेत हे स्मृती इराणी यांना कसे वाटले ते माहित नाही. सभागृहात असे काहीही घडले नाही, ज्याबद्दल त्या आरोप करत आहेत. चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्मृती इराणी यांचे हे सर्व सुनियोजित षडयंत्र आहे.
काय आहे प्रकरण?
९ ऑगस्ट रोजी सभागृहात अविश्वास प्रस्तावादरम्यान स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर सदनात फ्लाइंग किस दिल्याचा आरोप केला होता. इराणी म्हणाल्या की, सदनातून बाहेर पडताना खासदार राहुल गांधी यांनी महिलेकडे फ्लाइंग किसचे हावभाव केले. राहुल गांधी यांच्या कुटुंबीयांच्या संस्कृतीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तेव्हापासून या प्रकरणाने जोर धरला आहे.