ठाणे : भिवंडी शहरातील अवचित पाडा परिसरात असलेल्या भंगार गोदामांना मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत एकूण 15 भंगार गोदामे जळून खाक झाली आहेत. या भंगार गोदामात कापड, चिंध्या, पुठ्ठे, प्लस्टिक, तागे, पीओपी आणि इतर भंगार साहित्य मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आले होते. या आगीचे नेमके कारण समजले नाही. सुदैवाने या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
गोदामांना आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. या भंगार गोदामांच्या आजूबाजूला रहिवासी घरे आणि यंत्रमाग कारखाने आहेत, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परिसरात धुराचे लोट निर्माण झाल्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना त्रास सहन करावा लागला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल चार तास युद्धपातळीवर प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली आणि आगीवर नियंत्रण मिळवले. परंतु, या आगीत 15 भंगार गोदामे जळून खाक झाली.