पुणे : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अंमली पदार्थ तस्करीचे रॅकेट समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) च्या पथकाने शनिवारी पुण्यातील हडपसर व खडकवासला परिसरात छापे टाकले.
सुशांतसिंहच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासादरम्यान अनेक अंमली पदार्थ तस्करांची नावे समोर आली होती. त्यामध्ये बॉलिवूडमधील कलाकारांना अंमली पदार्थ पुरविणाऱ्यांबरोबच काही कलाकारांचीदेखील चौकशी करण्यात आली होती. याच प्रकरणात चिंकू पठाण व त्याचा साथीदार आरीफ भोजवाल यांची नावे समोर आली होती. ‘एनसीबी’च्या पथकाने दोघांनाही अटक केली होती.
चौकशीमध्ये राजू सोनावणे हा त्यांचा साथीदार असून त्याची अंमली पदार्थ तस्करीमध्ये महत्त्वाची भूमिका असल्याची माहिती ‘एनसीबी’ला मिळाली होती. सोनावणे याचे खडकवासला येथील घर आणि हडपसरमधील गोडाउनवर ‘एनसीबी’ने छापे टाकले. पठाण व भोजवाल या दोघांना अटक झाल्यानंतर सोनावणे पळून गेला आहे. त्याच्या घरात महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. तो कर्नाटकमधून फळे, धान्याची वाहतूक करताना अंमली पदार्थांची तस्करी करीत असल्याचे चौकशीत समोर आले आहे.




