यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, की एका अभिनेत्याने आत्महत्या करणं दुर्दैवी आहे. पण मीडियात ज्या पद्धतीने चर्चा होत आहे त्याचं आश्चर्य वाटतं. माझ्या जिल्ह्यात २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पण मीडियाने त्याची नोंदही घेतली नाही.
महाराष्ट्र तसंच मुंबई पोलीस सक्षम आहेत. त्यांच्यावर मला १०० टक्के विश्वास आहे. पण तरीही सीबीआय किंवा इतर यंत्रणेने तपास करावा असं वाटत असेल तर मी त्याला विरोध करणार नाही. चौकशी कोणी करायची हा राज्य सरकार, सीबीआयचा प्रश्न आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं.
पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती त्यासंबंधी त्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले, “माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही. ते इममॅच्युअर आहेत.”
ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे का ? असं विचारण्यात आलं असता यामागे नेमका काय हेतू आहे हे मी सांगू शकत नाही, असं ते म्हणाले.