मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने महाराष्ट्रात पुढील 3 दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून 19 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ह्या पावसाचा शेतकऱ्यांना फायदा होणार असून जे शेतकरी पिकांसाठी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे.
मुंबईत 18 ऑगस्ट रोजी पावसाचा जोर वाढणार असून काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात 17 आणि 18 ऑगस्ट रोजी अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भासाठी १८ ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असून सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
IMD Mumbai has issued heavy rainfall warnings for Maharashtra for coming 3 days, especially for Marathwada region and it will be good for farmers in that region and around, who are waiting for good spell of rains for their crops.@RMC_Mumbai https://t.co/FzesWQ8KBb
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 16, 2021
मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूरसाठी आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 24 तासांनंतर पावसाचा जोर वाढू शकतो. मात्र, 19 ऑगस्टनंतर पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा चांगला जोर असेल. प्रामुख्याने घाट परिसरात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिकसाठी आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील तीन दिवस नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. 18 ऑगस्ट रोजी नाशिकसाठी ऑरेंज अलर्ट ठेवण्यात आला आहे, तर नंदुरबार आणि धुळ्यासाठी यलो अलर्ट असेल.




