मुंबई : राज्य सरकारने रेशन कार्डधारकांसाठी दिवाळी पॅकेज जाहीर केले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. कार्डधारकांना 1 किलो रवा, बेसन, साखर, तेल फक्त 100 रुपयात मिळेल. “दिवाळीच्या मुहूर्तावर आम्ही १ कोटी ६२ लाख कार्डधारकांना दिवाळी पॅकेज देणार आहोत, त्यात रवा, बेसन, साखर, तेल अशा चार वस्तू पॅक करण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आज झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. पॅकेजमध्ये चार बाबींचा समावेश असेल, राज्यातील 7 कोटी लोकांना याचा थेट फायदा होणार आहे. हा संच एका महिन्याच्या कालावधीसाठी दिला जाईल आणि ई-पॉस प्रणालीद्वारे वितरित केला जाईल. यासाठी एकूण 486 कोटी 94 लाखांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली. रेशनचा हा संच दिवाळीपूर्वी वाटप करण्यात यावा, जेणेकरून कोणत्याही तक्रारी येऊ नयेत, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.




