पुणे : पाणीपुरवठा करणाऱ्या टेम्पोखाली चिरडल्याने एका दोन वर्षांच्या मुलाला आपला जीव गमवावा लागला. लोणीकंदमध्ये ही दुःखद घटना घडली. टेम्पोचा चालक अल्पवयीन मुलगा असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी अल्पवयीन चालक आणि त्याच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मृत मुलाचे नाव मल्हार अक्षय चापोडे (वय २) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा टेम्पो सदर परिसरात पाणीपुरवठा करत असताना अल्पवयीन मुलगा गाडी चालवत होता. यादरम्यान, गाडीने चुकून मल्हारला धडक दिली आणि तो पुढच्या चाकाखाली आला. मल्हारला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचार मिळण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अक्षय चापोडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी अल्पवयीन चालक आणि त्याच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लोणीकंद पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.




