नागपूर : नागपूर हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाईंडचे नाव तपासात समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हिंसाचारामागे फहीम खान नावाच्या व्यक्तीचा हात असल्याचे समोर आले आहे. फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) चा शहराध्यक्ष असल्याची माहिती आहे. फहीम खान नावाच्या व्यक्तीने परिसरात जमाव जमावल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. ३८ वर्षीय फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष असून, त्याने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. नागपूर शहरातील सोमवारी उसळलेल्या हिंसाचार प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे, हाच फहीम खान हिंसाचाराच्या काही तास आधी पोलिस स्टेशनमध्ये निवेदन देण्यासाठी गेला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, या हिंसाचाराचा पूर्वनियोजित कट रचण्यात आला होता. यात इतर अनेक संशयितांचीही भूमिका असण्याची शक्यता आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे, हिंसाचारानंतरही फहीम खानचे नाव थेट आरोपपत्रात नव्हते. मात्र, तपास पुढे सरकताच चित्र स्पष्ट झाले. सोमवारी, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने औरंगजेबाच्या कबरीविरोधात आंदोलन केले होते. यानंतर फहीम खानने आपल्या ४० ते ५० समर्थकांना एकत्रित करून गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी हजेरी लावली होती. आंदोलनादरम्यान चादर जाळल्याचा आरोप करत त्यांनी कारवाईची मागणी केली होती. मात्र, रोजाच्या कारणास्तव संध्याकाळी ही गर्दी पांगली. दरम्यान, सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास महाल परिसरात अचानक मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उफाळून आला. तपासानुसार, फहीम खानच्या नेतृत्वाखाली जमावाने दोन तासांहून अधिक काळ दंगल घडवली. या काळात सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले, तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, फहीम खान याने मोठ्या प्रमाणात लोकांना एकत्र आणून आंदोलन छेडण्याचे काम केले. त्यानंतर जमाव आक्रमक झाला आणि त्याने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यास सुरुवात केली. हिंसाचारादरम्यान अनेक वाहने फोडण्यात व जाळण्यात आली. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत हेही समोर आले आहे की, फहीम खानने पोलिस स्टेशनमध्ये जाऊन एका मागणीसाठी निवेदन दिले होते. मात्र, त्यानंतर त्याने आपल्या समर्थकांना भडकवले आणि मोठ्या प्रमाणावर जमाव जमवण्याचे नियोजन केले, असा आरोप एफआयआरमध्ये देखील करण्यात आला आहे. त्याच्या भूमिकेतील काही गूढ बाबी तपासात उघड झाल्या आहेत.
या हिंसाचारामुळे सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत ६५ जणांवर नामजद गुन्हा दाखल करण्यात आला असून, ६०० अज्ञात व्यक्तींवरही आरोप ठेवण्यात आले आहेत. पोलिसांनी अनेक आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यातील ४६ जणांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अजूनही संचारबंदी लागू आहे. नागपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिस्थिती नियंत्रणात असली तरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच टप्प्याटप्प्याने संचारबंदी शिथिल केली जाईल.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
नागपूर पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर हिंसाचाराशी संबंधित चुकीची माहिती पसरवू नये, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, कोणत्याही प्रकारच्या अनुचित प्रकारांवर पोलिस बारकाईने लक्ष ठेवून आहेत.