पुणे : पुण्यात बुधवारी सकाळी हिंजवडी आयटी पार्क परिसरात एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला आग लागल्याने चार जणांचा मृत्यू झाला. यात दहा प्रवासी भाजले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. आयटी पार्कच्या फेज १ मधील हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या कार्यालयाजवळ सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास गाडीला आग लागली. सुभाष भोसले, शंकर शिंदे, गुरुदास लोकरे आणि राजू चव्हाण अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मिनी बसमध्ये व्योमा ग्राफिक्स कंपनीचे १४ कर्मचारी होते. वाहन धावत असताना चालकाच्या सीटजवळ आग लागली आणि त्यानंतर चालकाने उडी मारली. ड्रायव्हरने उडी मारल्याने गाडी दुभाजकाला धडकल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, यातील आठ प्रवासी बाहेर पडण्यात यशस्वी झाले, तर पळू न शकलेले चार जण आगीमध्ये होरपळून मरण पावले. अधिक तपास सुरू आहे.
सर्व जखमींना हिंजवडी येथील रुबी हॉल क्लिनिकच्या आपत्कालीन काळजी विभागात हलवण्यात आले आहे. “त्यापैकी दोन जण ४० टक्क्यांहून अधिक भाजले आहेत आणि त्यांची प्रकृती गंभीर आहे, एक २० टक्के भाजला आहे आणि ५ टक्के भाजलेला दुसरा रुग्ण अजूनही बेशुद्ध आहे. किरकोळ भाजलेल्या एका व्यक्तीची प्रकृती स्थिर आहे. आमची टीम जखमींना उच्च दर्जाची काळजी आणि सहाय्यता देत आहे,” असे रुग्णालयाचे सीओओ डॉ. सुधीर राय आणि सीईओ बेहराम खोडाजी यांनी सांगितले.
हिंजवडीजवळ झालेल्या अपघातानंतर, आयटी कर्मचारी संघटनेने कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात घेऊन जाणाऱ्या वाहनांचे सुरक्षिततेसाठी ऑडिट करण्याची मागणी केली.




