पुणे : पुण्यात एका 18 वर्षीय तरुणीला क्वारंटाइन सेंटरमधून पळून जाण्याचा प्रयत्न करणं चांगलंच महागात पडलं. ही मुलगी खिडकीतून पळून जाण्याचा विचार करत होती. मात्र खिडकीतुन बाहेर निघताना ती खिडकीच्या गजांमध्ये अडकून बसली. तिला तेथून आत जाता येत नव्हतं आणि बाहेरही येता येत नव्हतं.
पुणे शहरातील एरंडवणे भागातील बमहीला सेवा मंडळाच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये रात्री साडे अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. येथे दुसऱ्या मजल्यावर या 18 वर्षीय तरुणीला ठेवले होते. मात्र तिने खोलीच्या खिडकीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, ही तरुणी खिडकीच्या गजांमध्ये अडकून बसली. हा प्रकार लक्षात येताच तिला तेथून काढण्याचे प्रयत्न सुरु झाले. पण कोणालाही तिला बाहेर काढता येईना. अखेर अग्निशमन दलाला त्याठिकाणी बोलवावे लागले. एरंडवणे अग्निशमन केंद्राचे अधिकारी आणि जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. ती तरुणी खूप घाबरली होती. त्यांनी त्या मुलीला धीर दिला आणि हायड्रॉलिक कटरचा वापर करून खिडकीचे गज कापून तिची सुटका केली.




