पुणे : हिंजवडी भागात काल सकाळी टेम्पोला आग लागल्याने 4 कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. हा अपघात नसून घातपात असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे. टेम्पोमधील कर्मचाऱ्यांना जाळून मारण्यात आले की काय, अशी शंका निर्माण झाली होती. अखेर पोलिसांचा संशय खरा ठरला असून, ड्रायव्हरनेच टेम्पो जाळल्याची माहिती समोर आली आहे. पुणे शहरातील हिंजवडी परिसरात एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सला काल सकाळी 8 वाजता भीषण आग लागली. या घटनेत कंपनीतील 4 कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला, तर टेम्पोही जळून खाक झाली. व्योमा ग्राफिक्स कंपनीचे 14 कर्मचारी या टेम्पोमध्ये प्रवास करत होते, ज्यात 10 जण बचावले.
हिंजवडी फेज 1 मध्ये टेम्पो ट्रॅव्हल्सला लागलेल्या आगीत चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली, त्यानंतर चालक आणि समोरच्या कर्मचारी तातडीने गाडीवरून उतरले. मात्र, मागील दार लॉक झाल्याने मागच्या भागातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तपासात समोर आले आहे की, हा अपघात नसून चालकानेच गाडी पेटवली. चालकाने सीटच्या खाली केमिकल ठेवले होते. त्यामुळे, चालकावर हत्येचा आणि हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची तपासणी करतांना पोलिसांनी सांगितले की, टेम्पो चालक जनार्दन हंबर्डेकर याने घातपात केल्याचे उघडकीस आले आहे. त्याने कंपनीतून केमिकल आणून ड्रायव्हर सीटखाली ठेवले होते आणि कापडाचे चिंधलेही ठेवले होते. फेज १ मध्ये एकेरी वाहतूक रस्ता सुरू झाल्यावर त्याने काडी पेटवून आग लावली आणि केमिकलचा भडका उडाला. भडका उडण्यापूर्वी तो गाडीतून उतरला होता. त्याने टेम्पोचा स्फोट घडवून आणला, अशी माहिती पिंपरी चिंचवडचे डीसीपी विशाल गायकवाड यांनी दिली. चालकाचा दिवाळीत पगार कापला होता तसेच गाडीतील सह कर्मचारी यांनी त्याला त्रास दिला होता. यामुळे त्याच्या मनात राग होता, असा पोलिसांचा दावा आहे.
या घटनेत जळालेल्या टेम्पोमध्ये होरपळून मृत्यू झालेल्या व्यक्तींनी बंद दरवाजा उघडण्याचा अतोनात प्रयत्न केला होता, परंतु तो उघडला नाही. घटनेनंतर, गाडीच्या आतील लोखंडावर आणि फुटलेल्या काचांवर नखांचे ओरखडे दिसले. या हृदयद्रावक घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती. त्यातच आता हा खुलासा झाल्याने खळबळ उडाली आहे.




