पुणे : पुण्यातील स्वारगेट स्थानकामध्ये पहाटेच्या सुमारास २६ वर्षीय तरूणीवर बलात्कार झाल्याचे भयंकर प्रकरण समोर आले आहे. नेहमी वर्दळ असलेल्या ठिकाणी अशा प्रकारचा गुन्हा घडल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच आता ज्या बसमध्ये हा अत्याचार झाला ती बस स्टेशनच्या मध्यभागी उभी असल्याची माहिती समोर आली आहे. दत्तात्रय गाडे असं आरोपीचं नाव आहे. आता याप्रकरणावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाल चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रूपाली चाकणकर यांनी सांगितलं कि, पुणे हे विद्येचे माहेरघर आहे, येथे अनेक जिल्हे, तालुके आणि वाड्या वस्त्यांमधून मुली शिक्षणासाठी येतात. पुणे कायम सुरक्षित राहिलं आहे, त्याच्यामुळे मुलींना पुण्यात सुरक्षित वाटत असतं. स्वारगेटमध्ये घडलेली घटना धक्कादायक असून सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. संबंधित मुलीवर अत्याचार करून आरोपी फरार झाला आहे. मुलीने स्वारगेट पोलीस स्टेशनला नऊ वाजता तक्रार नोंदवली. तिथल्या पोलीस अधिकारी पूनम पाटील आणि डीसीपी स्मार्तना पाटील यांनी जातीने या प्रकरणात लक्ष घातलं आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि मुलीने सांगितलेल्या वर्णनानुसार आरोपीचे फोटो कलेक्ट करत तो कोण आहे याची माहिती पोलिसांना समजली आहे. आरोपीच्या तपासासाठी आठ पोलीस पथके तयार केले असून ग्रामीण भागात आणि स्वारगेट परिसरात तपास करत आहेत. आरोपीचा सीडीआर काढला असून लोकेशन मिळेल आणि आज किंवा उद्या आरोपीला अटक होईल.
रूपाली चाकणकर पुढे म्हणाल्या कि, अनोळखी व्यक्तीसोबत संवाद साधू नका, संबंधित तरूणी मास्क घालून आलेल्या व्यक्तीशी बोलल्यानंतर त्या व्यक्तीने चौकशी केली, कुठे जायचंय, कोणतं गाव आहे, मी सोडतो असं बोलून आरोपी त्या तरूणीला गाडीमध्ये घेऊन गेला. त्यामुळे अनोळखी व्यक्तीशी बोलणं टाळा, तसेच अशा प्रसंगी आरडाओरडा करायला हवं.
येथे काही गोष्टी महत्वाच्या आहेत, संबंधित तरूणीच्या बाबतीत जे घडले, त्यावरून हे स्पष्ट होते की, अनोळखी लोकांसोबत संवाद साधणे धोक्याचं ठरू शकतं. त्याशिवाय, अशा प्रसंगी आवाज उठवणे आणि मदतीसाठी आरडाओरडा करणे महत्त्वाचे असते. आपली सुरक्षा कायम राखण्यासाठी सर्वांनीच सजग राहणं आवश्यक आहे.