पालघर : पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलींपैकी दोन मुली सख्ख्या बहिणी आहेत. याप्रकरणी गुजरातमधील सुरत येथून ४५ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कोठडीत त्याची चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पालघरमधील विरारमधील चंदनसर परिसरात राहतो. त्याचा एक मित्र तुरुंगात असून याच गोष्टीचा फायदा घेत त्याने आपल्या मित्राच्या मुलीला फूस लावून तिला आपल्या वासनेचा बळी बनवले. यानंतर तो तिच्यावर वारंवार बलात्कार करत राहिला. त्याचप्रमाणे, त्याने त्याच्या शेजारी राहणाऱ्या १३ आणि १७ वर्षांच्या दोन सख्ख्या बहिणींवर देखील वारंवार बलात्कार केला. हे अत्याचार अनेक दिवस चालू होते. जेव्हा मुली विरोध करायच्या तेव्हा आरोपी त्यांना जीवे मारण्याची धमकी देत असे.
दरम्यान, रविवारी पीडित बहिणींमध्ये वादावादी झाली जी त्यांच्या आईने ऐकली. त्यानंतर त्यांच्या आईने त्याबाबत विचारणा केल्यावर, दोन्ही मुली घाबरल्या आणि त्यांनी त्यांच्या आईला सर्व काही सांगितले. त्यानंतर त्यांच्या आईने विरार पोलिसांकडे धाव घेतली आणि भारतीय न्याय संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा, २०१२ च्या संबंधित कलमांखाली बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मागील वर्षी डिसेंबरपासून वारंवार मुलींवर बलात्कार करत होता. अखेर २३ फेब्रुवारी रोजी दाखल केलेल्या तक्रारीवरून, आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ६४(२)(एम) आणि ६५(१) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा (पॉक्सो कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला आणि आरोपीला गुजरातमधील सुरत येथून अटक करण्यात आली.