पुणे : पुण्याच्या मध्यवर्ती भागात मंगळवारी संध्याकाळी १७ वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना बाजीराव रोडवरील महाराणा प्रताप गार्डनजवळ घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. जुन्या वादातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे.
खडक पोलिस ठाण्याच्या माहितीनुसार, मृत तरुण हा आपल्या मित्रासोबत मोटारसायकलवरून जात असताना अचानक तीन किशोरवयीन मुलांनी त्याच्यावर हल्ला चढवला. आरोपींनी धारदार चाकूंसह हल्ला करून तरुणाला गंभीर दुखापत केली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. प्राथमिक चौकशीतून असे समोर आले आहे की, मृत तरुण आणि आरोपी हे सर्वजण पर्वती परिसरातील रहिवासी असून, त्यांच्यात काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्याच वादाचा राग मनात धरून आरोपींनी सूडाच्या भावनेतून ही हत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
“या घटनेत सहभागी असलेल्या तिन्ही अल्पवयीन मुलांची ओळख पटली असून त्यांना ताब्यात घेतले आहे. हत्येसाठी वापरलेले धारदार शस्त्र देखील जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे,” अशी माहिती खडक पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिली.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच, अल्पवयीन आरोपींच्या पालकांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले आहे.




