पुणे : ओबीसी आरक्षणावरून राज्यात वातावरण तापले आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. त्या म्हणाल्या की या सरकारला मला सांगायचंय, चुकून तुम्ही राज्यात सत्तेवर आलात, भविष्यात जनता तुम्हाला दारात देखील उभं करणार नाही. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलं. सरकारने 15 महिने फक्त गोल गोल फिरवलं, कुठलाही डेटा कोर्टात जमा केला नाही. यावेळी आरक्षण मिळेपर्यंत आम्ही निवडणुका होऊ देणार नाही, असा पुनरुच्चार देखील त्यांनी केला.
आज ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपने राज्यभर आंदोलन पुकारलं आहे. राज्याच्या विविध भागांत आज भाजप नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी रास्ता रोको, चक्काजाम आणि विविध आंदोलनाद्वारे आपला रोष व्यक्त करत आहेत. पुण्यात देखील भाजप नेत्यांनी आंदोलन करुन सरकारला जाब विचारला. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, “मी ओबीसींना सांगू इच्छिते तुम्ही आपलं मन तुटू देऊ नका. संघर्षाची भावना तुटू देऊ नका. ओबीसींच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी खंबीरपणे उभी आहे. भविष्यातल्या संघर्षासाठी आम्ही तयार आहोत.”
पंकजा मुंडे पुढे बोलताना म्हणाल्या, “मी मंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, तेव्हा ओबीसीचे आरक्षण पन्नास टक्क्यांच्या वरती गेले. याच्याविषयी कोर्टाच्या तारखा चालू होत्या, ते आरक्षण कसे योग्य आहे हे सांगण्यासाठी आम्ही कोर्टामध्ये काही डेटा सबमिट करत होतो. आम्ही काही सर्व्हे करत होतो. आम्हाला कोर्टाने वेळ दिला होता, तेवढ्यात आचार संहिता लागली त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आलं. जवळपास पंधरा महिने झाले हे सरकार फक्त कोर्टाकडून तारखाच घेत आहे. इंपिरिकलच्या आधारे कृष्णमूर्ती यांच्या मतांच्या आधारावर सरकारने हा सगळा डेटा सबमिट करावा असं त्यांनी सांगितलं, पण या सरकारने पंधरा महिन्यांमध्ये कुठलाही डाटा तयार केला नाही. सरकार फक्त गोल गोल फिरवतंय.
पंकजा मुंडे यांनी यावेळी काँग्रेसचा खरपूस समाचार घेत म्हटलं कि, “महाराष्ट्रभर आज चक्काजाम होतोय. भाजपाच्या आंदोलनानंतर सरकारी पक्षांमधील एका पक्षाने आंदोलनाची घोषणा दिली. मंत्री आज आंदोलनाची भाषा करतायत. शोभतं का तुम्हाला? आम्ही मंत्री असताना आंदोलन केलं का हो? आम्ही आरक्षण दिलं, आरक्षणाला संरक्षण दिलं. मंत्र्यांनी आंदोलन नाही तर निर्णय करायचे असतात. आंदोलन करायला विरोधी पक्ष आहे.”




