पुण्यातील वानवडी भागात पूजा चव्हाण नावाच्या 23 वर्षांच्या युवतीने रविवारी (७ फेब्रुवारी) रात्री इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. मूळची बीड जिल्ह्यातील परभणीची असलेली पूजा दोन मुलांसोबत वानवडी भागात फ्लॅटमध्ये राहत होती. रविवारी रात्री मित्रांसोबत पार्टी केल्यानंतर तिने इमारतीवरून उडी मारली.
पूजा चव्हाण ही तरुणी काही दिवसांपूर्वीच पुण्यात इंग्लिश स्पिकिंग क्लास साठी आली होती. तिच्या आत्महत्येनंतर तिचे आणि तिच्या मित्राचे राज्य सरकारच्या एका मंत्र्यांसोबतचे एका सार्वजनिक कार्यक्रमातले फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होऊ लागले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने पुणे पोलिस आयुक्तांना या प्रकरणाची चौकशी करावी, असं निवेदन देखील देण्यात आलं आहे.
दरम्यान, संबंधित मुलीचे भारतीय जनता पक्षाच्या राज्य पातळीवरील नेत्यांसोबतचे फोटो देखील सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात वायरल झाले आहेत. त्यामुळे या आत्महत्या प्रकरणात राज्य सरकार आणि भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु, या सर्व गोष्टीमुळे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील गूढ वाढले आहे.




