पुणे : पुण्यातील महात्मा फुले मंडईतील रामेश्वर चौकात तरुणावर कोयत्याने वार करत गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री एका तरुणावर पूर्ववैमनस्यातून हल्ला करण्यात आला. या घटनेत हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेखर शिंदे नावाचा तरुण रात्री नऊ वाजता रामेश्वर चौकातून जात होता. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. शेखर याच्या डोक्यावर आणि गळ्यावर कोयत्याने वार करत त्याला गंभीर जखमी केलं. वार होत असताना शिंदेने तिथून पळ काढला. मात्र, आरोपींनी त्याचा पाठलाग केला आणि आरोपीमधल्या एकाने त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. सुदैवाने गोळी न लागल्यामुळे शेखरचा जीव थोडक्यात बचावला. त्यानंतर शेखर मंडई चौकात पोहचल्यानंतर आरोपी तिथून फरार झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या शेखर शिंदेला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. या घटनेचा अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद करत आहेत.




