पुणे : कॅम्प परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटला पहाटे पावणे चारच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत मार्केटमधील मासे आणि चिकनची अंदाजे २५ दुकाने पूर्णपणे जळाली असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन विभागाच्या आठ गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
या ब्रिटिश कालीन छत्रपती शिवाजी मार्केटची वास्तू सुमारे दोनशे वर्षे जुनी आहे. या मार्केटमध्ये मासे, चिकन, भाजीपाला तसेच फळ विक्रेत्यांचे अनेक गाळे आहेत. या मार्केटमध्ये दुकानांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पुढील धोका लक्षात घेता अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होतं. या घटनेत मच्छी विक्रेत्यांची १७ आणि चिकन विक्रेत्यांची ८ अशी एकूण २५ दुकाने जळून खाक झाली. तसेच मार्केटचे लाकडी छत आणि जुनी सागवानी लाकडे जळून खाक झाली आहेत. यात दुकान मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.




