नाशिक महाराष्ट्र

पैशांच्या लालसेतून नाशिकमध्ये तरुणाची निर्घृण हत्या, थर्टी फर्स्ट पार्टीच्या बहाण्याने बोलावलं अन्…

नाशिक : नववर्ष स्वागताच्या पार्टीसाठी पैशांची गरज आणि महागड्या मोबाईलची लालसा एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यात उघडकीस आली आहे. सिन्नर तालुक्यातील पास्ते घाट परिसरात आढळलेल्या खून प्रकरणाचा छडा लावत सिन्नर पोलिसांनी अवघ्या 24 तासांत अल्पवयीन आरोपीसह दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ही घटना मंगळवार, 30 डिसेंबर रोजी उघडकीस आली. पास्ते घाटात रस्त्याच्या कडेला रक्तबंबाळ अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. प्राथमिक पाहणीत धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे आणि गळा आवळून हत्या केल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी सिन्नरचे पोलीस निरीक्षक भरत जाधव, सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील यांनीही घटनास्थळी भेट देत तपासाला गती दिली.

पोलीस तपासात मृत तरुणाचे नाव कमलेशकुमार लिलाधर पटेल (वय 30) असल्याचे निष्पन्न झाले. तो मूळचा मध्यप्रदेशातील गोटेगाव (तिघरा) येथील रहिवासी असून सध्या सिन्नर तालुक्यातील माळेगाव येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. औद्योगिक वसाहतीत काम करून तो उदरनिर्वाह करत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी कमलेशला थर्टी फर्स्ट पार्टी देण्याच्या बहाण्याने पास्ते घाटात नेले. तेथे त्याच्याकडील महागडा मोबाइल हिसकावला. यावरून त्यांच्यात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की आरोपींनी चॉपरसारख्या धारदार शस्त्राने त्याच्या पाठीवर व पायावर वार केले आणि अखेरीस गळा दाबून त्याची हत्या केली.

घटनेनंतर आरोपी सिन्नरहून कोनांबेच्या दिशेने पळून जाण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार समृद्धी महामार्गावरील पुलाजवळ सापळा रचण्यात आला. मोटारसायकलवरून येणाऱ्या दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्यांना तात्काळ पकडले.

या कारवाईत पोलीस निरीक्षक भरत जाधव, हेमंतकुमार भामरे, उपनिरीक्षक अंकुश वारुंगसे तसेच एमआयडीसी सिन्नर, सिन्नर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. पुढील तपास सुरू असून आरोपींविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत