शिवसेना खासदार संजय राऊत आज हृदयावरील उपचारासाठी लिलावती रूग्णालयात दाखल होणार आहेत. उद्या दुपारनंतर संजय राऊत यांच्यावर पुन्हा अँजिओप्लास्टी केली जाणार आहे. एक वर्षापूर्वी लिलावती रूग्णालयातच संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली होती. परंतु त्रास वाढू लागल्यानं त्यांना पुन्हा अँजिओप्लास्टी करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला होता.
लिलावती रूग्णालयातील प्रसिद्ध ह्रदयरोगतज्ञ डॉ मॅथ्यू आणि डॉ. मेनन राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करणार आहेत. आज सायंकाळी संजय राऊत लिलावती रूग्णालयात दाखल होणार असून सुरूवातीला अँजिओग्राफी केली जाईल आणि त्यानंतर उद्या दुपारी अँजिओप्लास्टी केली जाईल. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात संजय राऊत यांच्यावर हृदयात दोन स्टेन घालण्यात आल्या होत्या. त्यानंतर आणखी स्टेन टाकावे लागणार होते. त्यासाठी एप्रिल 2020 ही नियोजित वेळ होती. पण कोव्हिड प्रादुर्भावामुळे ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. संजय राऊत यांनी शनिवारी लीलावती रुग्णालयात आरोग्य तपासणी केली होती. त्यांची प्रकृती स्थिर आहे, मात्र त्यांना काहीसा थकवा जाणवत आहे.