मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या कोठडीची मुदत आज संपत आहे. अंमलबजावणी संचालनालय आज पुन्हा त्यांना न्यायालयात हजर करणार आहे. दुसरीकडे संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राऊत यांचा कॉलम रविवारी सामनामध्ये छापून आला. त्यानंतर राऊत यांनी तुरुंगातूनच ते लिहिलंय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणानंतर आता ‘सामना’ या मुखपत्रात लिहिलेल्या कॉलमबाबत ईडी राऊत यांची चौकशी करणार असल्याचे वृत्त आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये रविवारी संजय राऊतांचा साप्ताहिक कॉलम रोख-ठोक प्रसिद्ध करण्यात आला. तुपामुळे संजय राऊत जर आपल्या कोठडीत असतील तर सामनामध्ये त्यांचा लेख कसा काय छापून आला? असा प्रश्न ईडीच्या अधिकाऱ्यांना पडला आहे. यावरून ईडी राऊतांची चौकशी करणार आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, शिवसेना नेते संजय राऊत तुरुंगात असताना कॉलम लिहू शकत नाहीत. त्यांना लिहायचे असेल तर न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल. सध्या त्यांना अशी कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासासंदर्भात राऊत सध्या ईडीच्या कोठडीत आहेत.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनाच्या संपादकीयमधून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर हल्लाबोल केला होता. राज्यपालांनी आपल्या एका भाषणात म्हटले होते की, जोपर्यंत गुजराती आणि मारवाडी लोक मुंबईत आहेत, तोपर्यंत मुंबईला आर्थिक राजधानीचा दर्जा आहे. त्याचवेळी गुजराती-मारवाडी यांनी मुंबई सोडल्यास मुंबईत एक पैसाही शिल्लक राहणार नाही, असे ते म्हणाले होते. महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या वक्तव्यावर राऊत यांनी स्तंभातून प्रश्न उपस्थित केला होता. ते म्हणाले होते, ‘महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी कोणी खेळले तर मराठी माणूस भडकतो. हा इतिहास आहे. दरम्यान, ईडी आज राऊत यांना न्यायालयात हजर करणार आहे. ईडीचे अधिकारी न्यायालयाकडे राऊतांची कोठडी वाढवण्याची मागणी करू शकतात.




