मुंबई : मुंबईतील विक्रोळी परिसरात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी एक अत्यंत हृदयद्रावक दुर्घटना घडली असून निष्काळजीपणामुळे एका निष्पाप चिमुरडीला जीव गमवावा लागला आहे.
ही घटना 26 जानेवारी रोजी विक्रोळी पूर्वेकडील टागोर नगरमधील आंबेडकर नगर परिसरात घडली. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी रस्त्याच्या कडेला मोठा स्पीकर उभारण्यात आला होता. घटनेच्या वेळी तीन वर्षांची मुलगी खेळत असताना, अचानक तो स्पीकर तिच्या अंगावर कोसळला. या अपघातात ती गंभीर जखमी झाली.
प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार आणि समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, एका चिंध्या गोळा करणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर असलेले चिंध्यांचे गाठोडे स्पीकरच्या वायरमध्ये अडकले. त्यामुळे संतुलन बिघडून स्पीकर थेट मुलीच्या अंगावर पडल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या अपघातात चिमुकलीला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर तातडीने मुलीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या प्रकरणी विक्रोळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित निष्काळजीपणा, परवानगी आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांमधील सुरक्षेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.




