मुंबई : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दणका बसला आहे. न्यायालयाने राणा दाम्पत्याची याचिका फेटाळून लावली आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरुद्ध नोंदवण्यात आलेला दुसरा एफआयआर रद्द करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. या दोघांविरुद्ध दुसरी एफआयआर आयपीसीच्या कलम 353 अंतर्गत नोंदवण्यात आली, म्हणजे सरकारी कामकाजात अडथळा आणणे. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली.
दोन्ही एफआयआर एकत्र करण्यासही न्यायालयाने नकार दिला आहे. दोन्ही वेगळ्या घटना आहेत, त्यामुळे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आल्याचे न्यायालयाचे म्हणणे आहे. मात्र, दुसऱ्या एफआयआरमध्ये त्यांना अटक करण्यापूर्वी ७२ तासांची नोटीस देण्याचे आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत.




