मुंबई : मुंबईतील कुर्ला येथे लाल बहादूर शास्त्री रोडवर झालेल्या भीषण अपघातात सोमवारी रात्री बेस्ट बस चालकाने मार्केटमधील अनेक लोकांना बसखाली चिरडलं. या अपघाताने सर्वत्र खळबळ उडाली असून या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून ४८ जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. पोलीस सर्व तपास करत असून आरटीओचे पथक गाडीमध्ये काही बिघाड होता का? बसचे ब्रेक फेल झाले होते का? याचा तपास करत आहेत. बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात काही लोकांचे मृत्यू झाले, त्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
या अपघातानंतर बेस्ट बस चालक संजय माेरे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या अपघात प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, संजय मोरे याची नियुक्ती १ डिसेंबरला झाली होती. १० दिवसांचे ट्रेनिंग त्याने घेतल्याची माहिती समोर आली आहे. लॉकडाऊननंतर संतोष मोरे हा कंत्राटी चालक म्हणून बेस्टमध्ये काम करत होता. इलेक्ट्रिक बसचा त्याला फार काही अनुभव नव्हता. त्यामुळे त्याची नियुक्ती कोणी केली? असे सवाल उपस्थित झाले आहेत.
दरम्यान, संजय मोरे यांने मद्यपान केले नसल्याचे समोर आले आहे. त्याच्या कुटुंबियांनी बसमध्ये काहीतरी बिघाड असल्याचा दावा केला आहे. बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला असून पुढची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, बस चालक संजय मोरे याआधी छोट्या मिनीबस आणि इतर गाड्या चालवत होता. पण त्याला मोठी बस चालवण्याचा अनुभव नव्हता, अशी माहितीही समोर आली आहे.
सदर अपघातग्रस्त बस सध्या कुर्ला पश्चिम येथील बस डेपोमध्ये आणण्यात आली आहे. या बसच्या जवळ कोणाला ही सोडले जात नाही आहे. बसच्या काचा फुटल्या असून फॉरेंसिक टीमकडूनही या बसची तपासणी झाल्याची माहिती आहे. अपघातस्थळी फॉरेन्सिक पथक दाखल झाले आहे. तर कुर्ल्यातील भीषण अपघातानंतर कुर्ला स्टेशनबाहेरील बस स्थानक आज बंद आहे. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून बेस्ट प्रशासनाकडून ही खबरदारी घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.




