बेंगळुरू : बेंगळुरू येथील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या यूपीतील अतुल सुभाष नावाच्या व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पत्नीच्या छळाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे. याप्रकरणी त्यांनी 24 पानी सुसाईड नोट देखील मागे ठेवली आहे, ज्यामध्ये त्यांनी पत्नी आणि तिच्या नातेवाईकांवर त्याचा छळ केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी आरोप केला आहे की त्यांच्या पत्नीने त्याच्यावर अनेक खटले दाखल केले आहेत आणि आता ती 3 कोटी रुपयांची मागणी करत आहे. अतुल सुभाष हे बेंगळुरू शहरातील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मध्ये DGM म्हणून कार्यरत होते.
बेंगळुरू पोलिसांनी सांगितले की, ही घटना मंजुनाथ लेआउट भागात घडली, जे मराठाहल्ली पोलिस स्टेशनच्या हद्दीत आहे. 9 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता पोलिसांना फोन आला, ज्यामध्ये आत्महत्येची माहिती देण्यात आली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना घर आतून बंद असल्याचे दिसले. स्थानिक लोकांच्या मदतीने दरवाजा तोडला असता 34 वर्षीय अतुल सुभाष यांनी बेडरूममधील पंख्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले.
या घटनेची माहिती यूपीमध्ये राहणाऱ्या त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली, त्यानंतर त्याचा भाऊ विकास कुमार घटनास्थळी पोहोचला. विकास कुमारने सांगितले की, अतुलची पत्नी, तिची आई, तिचा भाऊ आणि तिच्या काकांनी त्याला खोट्या खटल्यात अडकवले आणि त्याच्याकडे 3 कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे अतुल सुभाषला प्रचंड नैराश्य आले होते, ज्यातून त्यांनी स्वत:चा जीव घेतला. अतुल यांच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून मराठहल्ली स्टेशनवर बीएनएस कायद्याच्या कलम १०८ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
पोलिसांनी सांगितले की अतुल यांनी आपली सुसाईड नोट अनेक लोकांना ईमेलद्वारे पाठवली आणि एका एनजीओच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर देखील शेअर केली. त्यांनी मेसेजमध्ये लिहिले की, “सर, हा संदेश निरोप देण्यासाठी आहे. शक्य असेल तर कृपया माझ्या कुटुंबाला मदत करा. आतापर्यंतच्या तुमच्या पाठिंब्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.” यामध्ये त्यांनी केलेल्या व्हिडीओची लिंक आणि सुसाईड नोटही पाठवली होती. सुभाषने आपल्या घरात एक फलक टांगला होता ज्यावर ‘न्याय बाकी आहे’ असे लिहिले होते. आत्महत्येपूर्वी अतुल सुभाषने कपाटावर महत्त्वाचे तपशील चिकटवले होते. ज्यामध्ये सुसाईड नोट, कारच्या चाव्या आणि त्याने केलेल्या सर्व कामांची माहिती होती, जी अद्याप प्रलंबित आहे.
अतुल सुभाषचे लग्न उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील निकिता सिंघानियाशी झाले होते. लग्नाच्या काही काळानंतर निकिता अचानक बंगळुरू सोडून जौनपूरला परतली आणि तिने तिच्या पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध हुंड्यासाठी छळ आणि घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला. मृत्यूपूर्वी अतुलने 24 पानांची सुसाईड नोट लिहून दीड तासाचा व्हिडिओ बनवला होता, ज्यामध्ये त्यांनी आपल्या वेदना व्यक्त केल्या होत्या. त्याच्या सुसाइड नोट आणि व्हिडिओमध्ये त्यांनी पत्नी निकिता सिंघानिया, सासू निशा सिंघानिया, मेहुणा अनुराग सिंघानिया उर्फ पियुष आणि चुलत सासरा सुशील सिंघानिया यांना आपल्या मृत्यूसाठी जबाबदार धरले आहे.
प्रचंड मानसिक त्रास :
पत्नी आणि सासरच्यांनी पैसे उकळण्याचा कट रचल्याचे अतुलने उघड केले. हुंडा, घरगुती हिंसाचार, खुनाचा प्रयत्न, अनैसर्गिक लैंगिक संबंध असे गंभीर खोटे आरोप त्यांच्यावर लावण्यात आले. या खटल्यांतर्गत अतुल आणि त्याच्या कुटुंबीयांना वारंवार न्यायालयात जावे लागले. अतुलने सांगितले की, आतापर्यंत या खटल्याची 120 हून अधिक वेळा सुनावणी झाली आहे आणि त्यांना 40 वेळा बेंगळुरू ते जौनपूर जावे लागले. ते म्हणाले की, बहुतेक तारखांना कोर्टात काम नसते, कधी न्यायाधीश नसतात, तर कधी संप असतो.
अतुलच्या म्हणण्यानुसार, त्याच्या पत्नीने घटस्फोटाच्या बदल्यात दरमहा 2 लाख रुपये पोटगी मागितली. तसेच, त्यांचे मूलही त्यांच्यापासून दूर केले. जौनपूरच्या प्रधान कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीशांनी तीन कोटी रुपयांची पोटगी देण्यासाठी दबाव आणल्याचेही त्यांनी सांगितले. सादरकर्त्याला न्यायालयात लाच द्यावी लागते, असा दावा अतुलने केला. त्याने लाच देण्यास नकार दिल्याने त्याच्यावर दरमहा 80 हजार रुपये भरपाई देण्याचा आदेश काढण्यात आला.
मृत्यूपूर्वी अतुलने आपल्या आई-वडिलांना त्रास देऊ नये, असे आवाहन न्यायव्यवस्थेकडे केले. त्यांनी आपल्या पत्नीला त्यांच्या पालकांना मुलाचे संगोपन करण्याची परवानगी देण्याची विनंती केली. तसेच, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपल्या अस्थिकलशाचे विसर्जन करू नये, अशी सूचनाही त्यांनी केली. न्याय मिळाला नाही तर माझ्या मृत्यूनंतर माझी राख न्यायालयासमोरील गटारात विसर्जित करा, असेदेखील त्यांनी सांगितले.




