मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना दिलासा मिळाला आहे. अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) चौकशी सुरू असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला, असे असूनही त्यांना तुरुंगातच राहावे लागणार आहे.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आणि 100 कोटी वसुलीचे आरोप असल्यामुळे अनिल देशमुख अटकेत आहेत. ईडी आणि सीबीआयने (CBI) गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. यानंतर आता देशमुखांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आहे. अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला असला तरीही त्यांना तुरुंगातच राहावे लागणार आहे, कारण त्यांना केवळ ईडीने दाखल केलेल्या गुन्हांमधून जामीन मंजूर झाला आहे. मात्र सीबीआयकडून अद्याप त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात त्यांना जामीन मिळालेला नाही. या कारणामुळे सध्या त्यांची तुरुंगातून सुटका होणार नाही.
देशमुख यांना आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात येणार आहे, कारण भ्रष्टाचारप्रकरणी त्यांची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) चौकशी सुरू आहे. 2019 ते 2021 या कालावधीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांची चौकशी सुरू आहे.




