एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असले तरी खासदार असणाऱ्या त्यांच्या सूनबाई रक्षा खडसे मात्र भाजपातच राहणार आहेत. एकनाथ खडसे यांनीच पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान रक्षा खडसे यांनी बोलताने खडसेंच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.
रक्षा खडसे म्हटल्या, आजचा दिवस अत्यंत दुखाचा आहे. बाबांनी जो निर्णय घेतला त्याचं दु:ख मलाही आहे. पण तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे,” असं त्या म्हणाल्या. भाजपामधून तुम्हीही बाहेर पडणार का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “मी भाजपाकडून निवडून आली आहे. लोकांनी मला भाजपा उमेदवार म्हणून निवडून दिलं आहे. मी पक्षाचं काम करणार असून पक्ष देईल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करणार. नाथाभाऊंनीदेखील ४० वर्ष पक्षात घालवली. पण व्यक्तिगत कारणामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला.
पक्षाने दिलं हे त्यांनीही मान्य केलं आहे. पक्षासोबत त्यांचंही योगदान आहे. जेव्हा आपण व्यक्ती म्हणून काम करतो तेव्हा योगदान महत्त्वाचं असतं. नाथाभाऊंनी कधीही माझ्यावर मी सांगेन तसं करायचं असा दबाव टाकला नाही. त्यांनी संस्कार, शिकवण दिली. जनतेची सेवा करण्यासाठी मी राजकारणात आले आणि तीच सेवा आज भाजपाच्या माध्यमातून करत आहे. त्यामुळे माझ्यावर कोणताहाी दबाव नाही, असं रक्षा खडसे यांनी स्पष्ट केलं.




