मनसे कार्यकर्त्यांनी पुण्यानंतर मुंबईतील अॅमेझॉनची कार्यालयं फोडली आहेत. अॅमेझॉनचं पुण्यातील कार्यालय फोडण्यात आलं. पुण्यातील कोंढवा भागातील ॲमेझोनच्या कार्यालयाची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली. त्यानंतर मुंबईत मनसे कार्यकर्त्यांनी चांदिवली येथील अॅमेझॉनच्या दोन कार्यालयात घुसून तोडफोड केली आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून ‘मराठी नाय तर अॅमेझॉन नाय’ अशी घोषणाबाजी करण्यात आली.
मनसेने सुरु केलेल्या मराठी भाषेच्या मोहिमेविरोधात अॅमेझॉनने कोर्टात धाव घेतली होती. यानंतर दिंडोशी कोर्टाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. कोर्टाने राज ठाकरे आणि काही मनसे सचिवांना ५ जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाने नोटीस पाठवल्यानंतर मनसेने आपण भूमिकेवर ठाम राहणार असल्याचं म्हणत यासाठी अॅमेझॉनला मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा अखिल चित्रे यांनी दिला होता.




