राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या विषाणूला प्रतिबंध करणाऱ्या मास्कचे दर नियंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. वाजवी दरात मास्क उपलब्ध करुन देणारे महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य झाले आहे. महाराष्ट्रात एन ९५ मास्क दर्जानुसार १९ ते ४९ रुपयांत तर दोन पदरी आणि तीन पदरी मास्क ३ ते ४ रुपयांना उपलब्ध होणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली.
मास्क संदर्भातल्या तक्रारींची दखल घेऊन त्या सोडवण्याची जबाबदारी राज्याच्या पातळीवर अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तसेच जिल्ह्याच्या पातळीवर जिल्हाधिकारी यांच्याकडे असेल. महाराष्ट्रात आरोग्य मंत्रालयाच्या बंधनाचे उल्लंघन करुन जास्त दराने मास्क विकताना आढळल्यास संबंधित व्यक्ती अथवा समूह अथवा संस्थेवर कारवाई केली जाणार आहे.
रुग्ण सेवा देणाऱ्या महाराष्ट्रातील सरकारी तसेच खासगी रुग्णालये/नर्सिंग होम/कोवीड केअर सेंटर/डेडीकेटेड कोवीड हॉस्पिटल्स इ. यांना मास्कचा पुरवठा करताना मास्कच्या विहित अधिकतम विक्री मूल्य मर्यादेच्या ७० टक्के दराने उपलब्ध करून देणे आवश्यक राहील. व खासगी रुग्णालयांनी या दराने मास्कची खरेदी केल्यानंतर त्यांना खरेदी किंमतीच्या ११० टक्के पेक्षा जास्त रक्कम रुग्णांकडून आकारता येणार नाही असे शासन आदेशात नमूद आहे. नवे मास्क खरेदी करताना किंमतींमुळे अडचणी येऊ नये यासाठी राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने मास्कच्या किंमती नियंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.




