पुणे : नवले पुलाजवळ 47 वाहनांना धडक देणाऱ्या ट्रक चालकाला सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली आहे. चाकण येथून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. नवले पूल परिसरात रविवारी रात्री झालेल्या अपघातात अनेकजण जखमी झाले. या प्रकरणी ट्रक चालक मणीराम छोटेलाल यादव (रा. मध्य प्रदेश) याच्या विरोधात सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. इंधन वाचवण्याच्या नादात ट्रक चालकाने उतारावर ट्रक न्यूट्रल केल्याने हा भीषण अपघात घडल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
रविवारच्या अपघातात जवळपास 47 गाड्यांचे नुकसान झाले असून कालच या भागात आणखी तीन अपघात झाले आहेत. त्यामुळे ही अपघातांची मालिका कधी थांबणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या अपघात मालिकेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या कि, ‘२०२१ मध्ये लोकसभेत या नवले पुलाबाबत मी भूमिका मांडली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष घातलं आणि नॅशनल हायवेने १८ ते २० बदलही केले. या ठिकाणी पुणे महापालिकेने जे सर्व्हिस रोड करायला हवे ते त्यांनी केलेले नाहीत. तसेच नॅशनल हायवेला विनंती करण्यात आली आहे की, जे उतार आहेत आणि जिथे सातत्याने अपघात होतात अशा ठिकाणच्या टेक्निकल बाबींचा अभ्यास करणे गरजेचं आहे.’
नवले पूल येथील अपघात दुर्दैवी आहे.येथे सातत्याने होणाऱ्या अपघातांबाबत लोकसभेत २०२१ साली प्रश्न उपस्थित केला होता.त्यावेळी केंद्रिय रस्ते व महामार्ग मंत्री मा. @nitin_gadkari यांनी रस्त्याच्या कामातील अडचणी दूर होऊन रस्त्याचे काम आगामी ६ महिन्यांत पुर्ण होईल असे आश्वासन दिले होते. https://t.co/W4YQTdp6v3
— Supriya Sule (@supriya_sule) November 21, 2022




