मुंबई : मुंबईतील नागरी वाहतूक संस्था बेस्टद्वारे चालवल्या जाणार्या इलेक्ट्रिक बसला बॅटरी चार्जिंग करताना आग लागली. ही घटना पहाटे पाचच्या सुमारास घडली. शुक्रवारी पहाटे बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट)च्या बसला मालवणी उपनगरात आग लागली. सुदैवाने, या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.
बसच्या छतावर असलेल्या बॅटरी सेटमध्ये ही आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आग आणखी पसरू नये म्हणून जवळच उभ्या असलेल्या बसेस तातडीने हलवल्या. बसेसमधील अग्निशमन यंत्रांचा वापर करून आग विझवण्याचा प्रयत्नही केला, मात्र तो अपुरा ठरला. दरम्यान, अग्निशमन दलाला तात्काळ माहिती देण्यात आली, त्यांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून पहाटे ५.१५ च्या सुमारास आग आटोक्यात आणली.
बेस्ट बसेसला आग लागण्याची या वर्षातील ही सहावी घटना आहे तर तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीतील तिसरी घटना आहे. 17 जुलै रोजी शहरातील अंधेरी भागातील मरोळ येथे बेस्टच्या बसला आग लागली, त्यावेळी 30 हून अधिक प्रवासी सुखरूप बचावले होते, तर एक महिना अगोदर 16 जून रोजी मालवणी उपनगरातील एका डेपोमध्ये उभी असलेल्या परिवहन संस्थेच्या इलेक्ट्रिक वातानुकूलित बसला आग लागली होती.
बेस्ट उपक्रम मुंबई, शेजारील ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर शहरांमध्ये सार्वजनिक बस सेवा पुरवते. वेगवेगळ्या खाजगी कंत्राटदारांकडून भाड्याने घेतलेल्या सुमारे 3,500 बसेसच्या ताफ्यासह 30 लाखांहून अधिक प्रवाशांची वाहतूक केली जाते.




