मुंबई : मुंबईतील कडवा शिवसैनिक आणि ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख सुधीर सयाजी मोरे यांचे निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांचा मृतदेह घाटकोपर रेल्वे स्थानकानजीक रुळांवर आढळून आला. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास सुधीर मोरे यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत रेल्वे ट्रॅकवर मिळाला.
माहितीनुसार, सुधीर मोरे गुरुवारी रात्री बैठकीला जायचे, असे सांगून बाहेर पडले. यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास घाटकोपर रेल्वे स्थानकातील फास्ट ट्रॅकवर त्यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या मृत्यूविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. परंतु, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. दुपारी दोन वाजता त्यांच्या निवासस्थानावरुन त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.
शिवसेनेचे माजी विभागप्रमुख सुधीर मोरे यांच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. विक्रोळी पार्क साईट परिसरात त्यांचा मोठा जनसंपर्क होता. रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्कप्रमुख म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी बजाविली होती. यांच्या निधनाने एक निष्ठावान शिवसैनिक काळाच्या पडद्याआड गेला आहे. pic.twitter.com/gC90sAZlvR
— Anil Parab (@advanilparab) September 1, 2023
सुधीर मोरे यांनी विक्रोळी पार्कसाईट परिसरातून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. शिवसेनेच्या तिकीटावर ते मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. आपल्या कारकीर्दीत त्यांनी पार्कसाईट विभागात एकदाही शिवसेनेचा पराभव होऊन दिला नाही. कार्यकर्त्यांचे भक्कम जाळे आणि मोठा जनसंपर्क या सुधीर मोरे यांच्या नेतृत्त्वाच्या जमेच्या बाजू होत्या. पालिकेच्या या प्रभागात शेवटपर्यंत त्यांचे वर्चस्व कायम होते. सुधीर मोरे हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ते जवळचे म्हणून ओळखले जात. त्यांच्यावर विभागप्रमुख, संपर्कप्रमुख अशा अनेक जबाबदाऱ्याही सोपवण्यात आल्या होत्या. सध्या ते रत्नागिरीचे संपर्कप्रमुख होते.




