पतीने रागाच्या भरात पत्नीची चाकूने भोसकून हत्या केली आणि नंतर स्वतः धावत्या ट्रेनखाली उडी मारून आत्महत्या केली. पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे बुधवारी मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली. पती-पत्नीच्या भांडणामुळे संपूर्ण कुटुंब उध्वस्त झालं. या दाम्पत्याला दोन मुलंदेखील आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास या महिलेचा पती कामावरून घरी आला. त्यानंतर काही वेळाने पती आणि पत्नीचे भांडण सुरु झाले. त्यांची अकरा वर्षांची मुलगी दुसऱ्या खोलीत होती, तर नऊ वर्षांचा मुलगा घाबरून घराबाहेर गेला आणि या दोघांमधील भांडण सोडवण्यासाठी त्याने शेजाऱ्यांना बोलावले. शेजाऱ्यांनी मध्यस्थी करून त्यांचे भांडण मिटवले. त्यानंतर सर्व कुटुंब झोपी गेले.
मध्यरात्री दोनच्या सुमारास पुन्हा या दाम्पत्यामध्ये भांडण सुरू झाले. भांडण वाढत गेले आणि अडीचच्या सुमारास रागाच्या भरात पतीने चाकूने पत्नीला भोसकले. यात तिचा मृत्यू झाला. आवाज ऐकून शेजारी धावून आले. त्यांनी दरवाजा ठोठावला. आरोपी पतीने दरवाजा उघडला. मात्र, आतमधील दृश्य बघून सर्वांना धक्का बसला. आरोपीची पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. आरोपी तेथून पळून गेला.
शेजाऱ्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. साडेतीनच्या सुमारास पालघर रेल्वे पोलिसांना माहिती मिळाली की बोइसर रेल्वे स्थानकाजवळ धावत्या ट्रेनखाली उडी मारून एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे. या व्यक्तीची ओळख पटली आणि पत्नीची हत्या केल्यानंतर त्यानेही आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी या घटनेची नोंद करून घेतली असून ते पुढील तपास करत आहेत.




