अहमदनगर : माजी केंद्रीय राज्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप गांधी यांचं आज कोरोनामुळं निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर दिल्लीतच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
काही दिवसांपासून ते दिल्लीतच राहत होते. त्यांनी नुकतीच कोरोना चाचणी करून घेतली होती. त्यांना कोरोना झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर ते मंगळवारी रुग्णालयात दाखल झाले होते. तिथं काल दुपारपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.