मुंबई : चंद्रपूर-मूल महामार्गावर अजयपूर येथे झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 9 जणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
अजयपूर गावाजवळ काल रात्री पेट्रोल टँकर आणि ट्रकमध्ये अपघातानंतर मोठी आग लागून ट्रकमधील नऊ मजुरांचा भाजून मृत्यू झाला होता. मुख्यमंत्र्यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून आर्थिक मदत जाहीर केली आहे.
अजयपूर गावाजवळ रात्री २ ट्रकमध्ये धडक झाली. पेट्रोल वाहतूक करणारा टँकर आणि लाकूड नेणाऱ्या ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघातानंतर भीषण आग लागली. आगीमुळे ट्रकचे टायर फुटले आणि आग आणखी भडकली. ही आग भयंकर होती. पेट्रोल टँकर आणि दुसऱ्या ट्रकमध्ये लाकडं असल्याने आगीने रौद्ररूप धारण केलं होतं. मूल-चंद्रपूर अग्निशमन दलाच्या पथकांनी आग नियंत्रणात आणली. या अपघातात एकूण ९ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेत टँकरमधील चालक-वाहकांचा मृतांमध्ये समावेश आहे. तर लाकूड भरलेल्या ट्रकमधील ७ जणांचा या घटनेत मृत्यू धाला.




